तुषार राैंदळ,
सटाणा (प्रतिनिधी): सटाणा शहरात सुरू असलेल्या देवमामलेदार यात्रोत्सवाच्या काळात बनावट पाचशे रुपयांच्या नोटांचा वापर करून फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीवर सटाणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एका डॉक्टरसह सात युवकांना अटक करण्यात आली असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवार (दि. १९) रोजी रात्री पोलिसांना खबऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळाली होती की, एम.एच. ४१ बी.ई. ४६४५ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून बनावट ५०० रुपयांच्या नोटा सटाणा शहरात आणून यात्रेत वापरण्याचा डाव आखण्यात आला आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त आधीच तैनात असताना पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तात्काळ हालचाल सुरू केली.
संशयित चारचाकी वाहन सटाणा–ताहाराबाद मार्गावरील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले असता आरोपी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला बनावट नोटा देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावेळी पोलिसांनी त्वरित कारवाई करत सर्व आरोपींना रंगेहाथ पकडले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून सुमारे १५ हजार रुपयांच्या बनावट पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. या कारवाईत हर्षल आबासाहेब नंदन (२०), अनिकेत विलास नवरे (२०), जयेश तुकाराम पवार (२०), गौरव संजय पवार (३०) सर्व रा. ताहाराबाद तसेच दादाजी गवळी (२८), प्रफुल रविंद्र गवळी (२९), शाम दादाजी गवळी (२७) सर्व रा. अंतापूर, ता. बागलाण या सात युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व आरोपी बागलाण तालुक्यातीलच असल्याने परिसरात भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार (दि. २०) रोजी आरोपींना सटाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सातही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये चार महागडे मोबाईल फोन, वापरण्यात आलेले चारचाकी वाहन व इतर साहित्याचा समावेश आहे.
या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता असून बनावट नोटांचा पुरवठा कुठून होत होता, त्या नोटा छापल्या जात होत्या की बाहेरून आणल्या जात होत्या, तसेच यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच या बनावट नोटा प्रकरणाचा संपूर्ण छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर देवमामलेदार यात्रेतील व्यापारी, दुकानदार व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक व्यापारी ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारताना अधिक सतर्कता बाळगत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तर ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास थेट नकार दिला जात असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने नागरिक व यात्रेकरूंना आवाहन केले आहे की, व्यवहार करताना नोटांची काळजीपूर्वक तपासणी करावी. कोणतीही संशयास्पद नोट आढळल्यास ती वापरण्याऐवजी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. सटाणा शहर व संपूर्ण तालुक्यात किती दिवसांपासून बनावट नोटांचा व्यवहार सुरू होता, तसेच नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान अशा नोटांचा वापर झाला का, याचाही तपास पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
