पोलिसांनी दोघा संशयितांना दोन तासांच्या आत घेतले ताब्यात!
नाशिक (प्रतिनिधी): ‘यहाँ पे क्यू खडा है?,’ असे दुचाकीवरून जाणा-या युवकाने म्हणताच. दोघा संशयितांनी त्याच्यावर तुटून पडत धारदार शस्त्राने सपासप वार करीत त्याचा खून केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्वामीनगर परिसरात घडली. ही घटना जुन्या वादातून घडली असून, आठ दिवसांपूर्वी दुचाकीचा कट लागल्याचा राग मनात धरून संशयितांनी युवकावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच संशयितांना अटक केली असून, न्यायालयाने दोघांनाही बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत भदाणे (वय २५, रा. स्वामीनगर, अंबड, मूळ रा. जांभोरे, ता. धरणगाव, जि. जळगाव) हा शनिवारी (दि. २८) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास स्वामीनगर परिसरातून जात होता. यावेळी संशयित सुफियान अनिस अत्तार (वय १८, स्वामीनगर, अंबड) व विक्की बंटी प्रसाद (वय २०, रा. माऊली लॉन्सजवळ) हे दोघे स्वामीनगर येथे उभे असताना दुचाकीवरून जाणा-या प्रशांत याने ‘यहाँ पे क्यूं खडा है?,’ अशी विचारणा केली. त्यावर संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढत प्रशांत याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रशांतच्या डोक्याला, चेह-यावर व डोळ्याखाली वर्मी घाव लागल्याने अति रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरनार, सहायक निरीक्षक किरण रौंदळे, उपनिरिक्षक नितीन फुलपगारे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. गुन्हे शोध पथकाने तत्काळ तपास करीत दोघा संशयितांना अवघ्या दोन तासांच्या आत ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असून, न्यायालयाने त्यांना दि.३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदेश पाडवी अधिक तपास करीत आहेत.
