सोनाराच्या दुकानातून अंगठी चोरणारी ‘बंटी-बबली’ जोडी पोलिसांच्या जाळ्यात…

नाशिक (प्रतिनिधी): सोनाराच्या दुकानातून सोन्याची अंगठी लांबविणाऱ्या मालेगाव येथील ‘बंटी-बबली’ जोडीला अखेर पोलिसांनी गजाआड केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सखोल तपास करून दोघांना अटक केली असून त्यांना पुढील तपासासाठी लासलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयितांची नावे नाजीया शेख इस्माईल (३२, रा. सलीमनगर, मालेगाव) आणि शेख करीम शेख आमीन (१९, रा. गायकवाड चौक, मालेगाव) अशी आहेत. पंधरा दिवसांपूर्वी लासलगाव (ता. निफाड) येथील वर्मा ज्वेलर्स दुकानातून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरीस गेली होती. खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या महिलेनं बनावट अंगठी काउंटरवर ठेवली आणि तिच्यासोबत आलेल्या तरुणाने खऱ्या सोन्याची अंगठी हातोहात लांबवली. काही वेळानंतर ही बाब निदर्शनास आल्यानंतर दुकान मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. लासलगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. एलसीबी पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घेतला व दोघांना अखेर बेड्या ठोकल्या. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!