नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे बुधवारी चंपाषष्टी उत्सवानिमित्त आयोजित परंपरागत बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमादरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली. किरण कर्डक या तरुण भाविकाचा बारागाड्यांच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.
ओझर परिसरात चंपाषष्टीचा उत्सव पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांतून मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिकांनी गर्दी केली होती. बारागाड्या ओढण्याचा पारंपरिक कार्यक्रम सुरू असतानाच अचानक मोठी गर्दी उसळली. या गोंधळात किरण कर्डक पुढे येऊन बारागाड्यांच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून उत्सवातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पारंपरिक कार्यक्रमात योग्य गर्दी नियंत्रण आणि सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याचा आरोपही स्थानिकांकडून पुढे येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
