नाशिक महापालिका घेणार जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य
नाशिक (प्रतिनीधी): सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील वाढते सांडपाणी प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक महापालिकेकडून ३०० कोटी रुपयांचा अत्याधुनिक मल:निस्सारण प्रकल्प (एसटीपी) राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी महापालिकेने जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याचे ठरविले आहे.
या योजनेअंतर्गत सांडपाणी वाहून नेण्यासाठी जवळपास १११ किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या बसविण्यात येणार असून १८ दशलक्ष लिटर क्षमतेचा एसटीपी उभारला जाणार आहे.
सातपूर आणि अंबड येथील एमआयडीसी परिसरात सुमारे ३,५०० हून अधिक उद्योग कार्यरत आहेत. या कंपन्यांतून दररोज लाखो लिटर रसायनयुक्त सांडपाणी बाहेर पडते. सध्या त्याची योग्य विल्हेवाट न लागल्यामुळे जमीन, नदी आणि नाल्यांचे प्रचंड प्रदूषण होत आहे.
एमआयडीसीमधील ‘सीईटीपी’चे काम अद्याप अपूर्णच असल्याने महापालिकेने रहिवासी भागातील एसटीपीमध्ये हे पाणी स्वीकारण्यास पूर्वीच नकार दिला होता. तसेच महापालिकेकडून मलजलवाहिन्या टाकण्याचे कामही अद्याप झालेले नव्हते. यामुळे निमा आणि आयमा सारख्या औद्योगिक संघटनांकडून सतत या कामाची मागणी करण्यात येत होती.
आता सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला गती मिळाली असून प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास औद्योगिक परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन सुलभ होणार असून पर्यावरण प्रदुषणातही मोठया प्रमाणात घट होण्याची अपक्षा आहे.
महापालिकेच्यावतीने केंद्र शासनाच्या निधीतून गंगापूर गाव येथे अस्तित्वातील १८ दशलक्ष लिटर क्षमतेच्या मलशुध्दीकरण केंद्रालगत नव्याने ११.५० एमएलडी क्षमतेचा ‘एसटीपी’ बांधला जात आहे. त्या प्रकल्पातून वीस दशलक्ष लिटर इतके पाणी पुनर्वापर करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. पुनर्वापरासाठी उपलब्ध होणारे पाणी सातपूर औद्योगिक क्षेत्रातून कॅनॉलने कामटवाडे पंपीग स्टेशनलगत असलेल्या नंदिनी नदीमध्ये सोडले जाणार आहे. मनपा क्षेत्रातील उद्याने, उद्यानातील पादचारी मार्गांची स्वच्छता, प्लास्टिक, फायबरचे शिल्पांची स्वच्छता आदींसाठी पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरले जाणार असल्याची माहिती मनपाचे मल:निसारण विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.

