वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कार्यालय सोडून गेल्यास होणार कारवाई: मनीषा खत्री

  • कामचुकार कर्मचारी, अधिका-यांना मनपा आयुक्तांची तंबी
  • वॉच ठेवण्याचे खातेपमुखांना निर्देश
  • शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा
नाशिक (प्रतिनिधी) : सतत गैरहजर आणि वारंवार विविध कारणे सांगून टप्पा मारणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांना आता विनापरवानगी, तसेच वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कार्यालय सोडून गेल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नूतन आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी यासंदर्भात खातेप्रमुखांना परिपत्रक काढत कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवण्याची सूचना केली आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे या संधीचा गैरफायदा घेत, अनेक अधिकारी आणि कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याने नागरी सेवा सुविधांविषयी मोठ्या प्रमाणावर ओरड सुरू आहे. महापालिका प्रमुखच मुख्यालयात हजर राहत नसल्याने अनेकांना रान मोकळे झाले आहे. त्यामुळे बहुतांश कर्मचारी महापालिकेतील आपले काम कमी आणि खासगी कामे करण्यालाच प्राधान्य देताना, तसेच बाहेर जाऊन चहापान करताना दिसून येतात. परिणामी महापालिकेत विविध कामांसाठी येणा-या नागरिकांना व अभ्यागतांना तिष्ठत बसावे लागते किंवा वाट पाहून काम न होताच माघारी फिरावे लागते. त्यामुळे महापालिकेत काम करण्याबाबतची शिस्तच राहिली नव्हती. अधिकारी देखील दुपारच्या वेळी साइट व्हिजिटच्या नावाखाली घरी आराम करण्यासाठी वा खासगी कामासाठी निघून जात असल्याने कर्मचाºयांवर अजिबात वचक राहिला नव्हता. मात्र, आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी हाती सूत्रे घेतल्यानंतर वर्षाच्या पहिल्याच दिवशी खातेप्रमुख, तसेच विभागीय अधिका-यांना परिपत्रक काढत कर्मचारी व अधिका-यांच्या बेशिस्तपणाची दखल घेऊन शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच, तक्रारदारांच्या समस्यांचे निराकरण आपापल्या स्तरावरच करणे अपेक्षित आहे. शक्यतो कोणत्याही नागरिकास त्याच्या किरकोळ कामाकरिता आयुक्तांकडे यावे लागणार नाही, याची दखल घेण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!