- वणी पोलिसांची मोठी कारवाई!
- मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता?
कृष्णा पैठणे,
वणी (प्रतिनिधी): गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकसह सुमारे साडे त्रेचाळीस लाखांचा मुद्देमाल वणी पोलिसांनी हस्तगत केला असुन या प्रकरणी अ.नगर जिल्ह्यातील तिघांसह दोघा परप्रांतीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याबाबत वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल गुरुवार दि. १७ रोजी सांयकाळच्या सुमारास राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची गुजरात राज्यातुन MH 15 JC 5522 या आयशर ट्रकमध्ये भरुन महाराष्ट्रात अवैधरित्या वाहतूक केली जात होती. दरम्यान, वणी पोलिस ठाणे हद्दीतील पांडाणे टोल नाका परिसरात वणी पोलिसांनी थांबवुन चौकशी केली असता सदर ट्रक मध्ये हिरा पान मसाला किंमत रुपये १८ लाख ७२ हजार, रोयाल ७१७ तंबाखू किंमत ४ लाख ६८ हजार रुपये, तपकीरी रंगाची आयशर ट्रक किंमत २० लाख रुपये, एक मोबाईल फोन किंमत ५ हजार रुपये व प्लॅस्टीकची कॅरेट किंमत २० हजार रुपये असा एकुन ४३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल वणी पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी शौकत चाँद शेख रा. अहिल्या नगर, शेख जमील जब्बार रा. शेवगाव जि. अहिल्या नगर, रिजवान भाई रा. श्रीरामपुर जि. अहिल्या नगर ह्या तिघांसह गुजरात राज्यातील व्यापारी मदनी चाचा रा. उन पाटीया व शोयेब (नाव पुर्ण माहित नाही) ह्या पाच संशयीतां विरोधात भारतीय न्याय संहिता चे कलम १२३, २७४, २७५, ३(५) प्रमाणे वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.
