नाशिक (प्रतिनिधी): अमृतधाम (पंचवटी) जवळील एका हॉटेलच्या आडून लॉजमध्ये देहविक्रीचा अड्डा चालविणारा हॉटेल मालक तीन दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याप्रकरणी परप्रातीय मॅनेजर मात्र अटकेत असून प्राथमिक चौकशीत पीडितांना धाक दाखवून त्यांच्याकडून हा व्यवसाय केला जात असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवली हॉटेलमधील मधुबन लॉजचा मालक प्रवीण मधुकर खर्डे (रा. नाशिक) हा छापा टाकण्यात आल्यापासून पसार आहे. छाप्याच्यावेळी लॉजमध्ये सापडलेला व्यवस्थापक मंटुकुमार सीताराम यादव (वय ३२) याला अटक करण्यात आली. दरम्यान, चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांचा ताबा महिला वात्सल्य गृहाकडे आहे. तर ताब्यात घेतलेल्या ग्राहकांची चौकशीअंती सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, अमृतधामजवळील करवली हॉटेलातील मधुबन लॉजवर पीसीबी-एमओबी पथकाने शनिवारी (दि.१२) छापा टाकून अवैधरित्या देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. याबाबत लॉज मालक खर्डे व व्यवस्थापक यादव विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये(पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खर्डे कारवाई झाल्यापासून पसार असुन त्याचा मोबाइलही बंद असल्याने शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.
