नाशिक (प्रतिनिधी): हॅपी होली म्हणत पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आलेल्या सुलभ शौचालय कर्मचाºयाची प्राणज्योत सोमवारी (दि. २४) मालवली. चार दिवस जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्षात सुरू असलेली त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. ही घटना ठक्कर बाजार बसस्थानक आवारात घडली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात, प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आता खुनाचे वाढीव कलम लावण्याचे कामकाज सुरू होते.
विजय इलमचंद गेहलोत (वय ५४, रा. देवळाली कॅम्प) असे मृत सुलभ शौचालय कामगाराचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २१) रात्री शुभम सतीश जगताप (वय २२, रा. खाकी आखाडा, नागचौक, पंचवटी) या संशयिताने दारूच्या नशेत गेहलोत यांच्या अंगावर प्लास्टिकच्या पिशवीतील पेट्रोल ओतून लायटरच्या साह्याने पेटवून दिले होते. त्यानंतर गेहलोत यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेत ते ६५ टक्के भाजले होते. घटनेनंतर काही तासांतच संशयित शुभम यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
