नाशिक (प्रतिनिधी): सिंहस्थ कुंभमेळ्याचे नाव त्र्यंबकेश्वर-नाशिक की नाशिक-त्र्यंबकेश्वर ठेवायचे यावरून दोन्हीकडील साधुमहंतांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. रविवारी (दि. २३) त्र्यंबक येथील साधुमहंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा’ असा उल्लेख न करता ‘त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा’ असा प्रचार करण्याची मागणी केली होती. त्यास नाशिकच्या साधुमहंतांनी विरोध करीत आपली भूमिका मांडली आहे. याबाबतचा निर्णय शासनच घेईल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देत विविध ठिकाणांची पाहणी केली. या भेटीत त्यांनी साधुमहंतांशी सिंहस्थाविषयी चर्चा करत त्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्र्यंबकेश्वर हेच सिंहस्थ कुंभमेळ्याचे मुख्य स्थान असल्याने कुंभमेळ्याचा उल्लेख ‘त्र्यंबकेश्वर-नाशिक’ असा करावा, अशी मागणी त्र्यंबकच्या साधुमहंतांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. त्यानंतर सोमवारी (दि. २४) जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या उपस्थितीत महापालिकेत साधुमहंतांची बैठक पार पडली. या बैठकीत नाशिकच्या साधुमहंतांचे प्रवक्ते महंत भक्तिचरणदास महाराज यांनी साधुमहंतांच्या मागण्या मांडताना ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा’ असेच नामाभिधान योग्य असल्याचे सांगत तशी जुनी नोंद देखील असल्याचा दावा केला. त्र्यंबकेश्वर हा नाशिक जिल्ह्याचाच भाग असल्याने कुंभमेळ्याच्या नावावरून वाद निर्माण करणे योग्य नसून, वाद केला जाऊ नये, असे आवाहन महंत भक्तिचरणदास यांनी केले. महंत सुधीरदास पुजारी यांनी व्याकरणदृष्टया नाशिक-त्र्यंबकेश्वर हेच नाव योग्य असल्याचे सांगत या आधीही हेच नाव असल्याचा उल्लेख केला. दोन्ही ठिकाणांना स्थान माहात्म्य असल्याने असा वाद नको. नाशिक येथेही कुंभमेळा काळात स्नान होते. पेशवेकालीन निवाडा झाला असताना आता पुन्हा वाद करू नये, असे सुधीरदास पुजारी यांनी सांगितले.
