नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शहर परिसरातील गोठेधारकांना २०२५-२६ या वर्षाकरिता परवाना नूतनीकरण व नवीन परवाना काढण्यासाठी १ ते ३० एप्रिल अशी मुदत देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रातील सर्व गोठेधारकांनी परवाना नूतनीकरण व विनापरवाना गोठेधारकांनी नवीन परवाने काढून घ्यावेत. ज्या व्यक्ती विना परवाना गुरांचा सांभाळ करतील किंवा परवाना नूतनीकरण करणार नाहीत. अशा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी वाय. आर. नागरे यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील नाशिक शहर परिसरासह गंगापूर, आनंदवली, मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, मानूर, वडनेरदुमाला, पिंपळगाव खांब, दाढेगाव, पाथर्डी वडाळा (शिवार), त्र्यंबक खुर्द, कामटवाडे, चुंचाळे, पिंपळगाव बहुला या भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच विना परवाना अथवा विना अनुज्ञप्ती गुरे बाळगणे यासाठी दोन हजार रुपयांपर्यंत दंड व तीन वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये गुरे पाळणे आणि त्यांची ने-आण करणे (नियंत्रण) अधिनियम १९७६ कायद्याच्या अधिनियम कलम १३ (१) (ब) अन्वये करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या अधिसूचनेद्वारे नाशिक महानगरपालिका क्षेत्रासाठी महाराष्ट्र नागरी क्षेत्रामध्ये गुरे पाळणे आणि त्यांची ने-आण करणे (नियंत्रण) अधिनियम १९७६ हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यान्वये विना परवाना गुरे पाळणे, गुरांची ने-आण करणे गुन्हा आहे. महानगरपालिका क्षेत्रातील गुरे परवाना धारकांनी नूतनीकरणासाठी येताना सोबत मूळ परवाना व प्रति जनावर ५० रुपये अनुज्ञप्ती शुल्क आणावे. ३० एप्रिलपर्यंत परवाना नूतनीकरण न केल्यास प्रति जनावर पाच रुपये इतके विलंब शुल्क आकारण्यात येईल, याची गोठेधारकांनी नोंद घ्यावी, असेही नागरे यांनी कळविले आहे.
