वणी (प्रतिनिधी): विवीध स्थानिक क्रिडा स्पर्धांमधुन भविष्यातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू उदयास येतात असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी वणी येथे ज्ञानगंगा बहुद्देशीय संस्था व ओजस आर्थरायटीस व ऱ्हुमटोलाॅजीस्ट सेंटरच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथाॅन स्पर्धे प्रसंगी केले. दरम्यान विवीध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तीन मान्यवरांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
वणी येथे आज रविवार दि. २२ रोजी ज्ञानगंगा बहुद्देशीय संस्था व ओजस आर्थरायटीस व ऱ्हुमटोलाॅजीस्ट सेंटरच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार भास्कर भगरे, वणीचे उपसरपंच विलास कड होते तर अध्यक्षस्थानी रविकुमार सोनवणे होते. दरम्यान सर्वप्रथम संधीवात जनजागृतीसाठी सर्व स्पर्धकांनी हाताच्या पंजाच्या आकृतीत उभे राहुन सामुहीक राष्ट्रगीत म्हटले. दरम्यान डाॅ. प्राची पाटील यांनी संधिवात जागृतीपर माहिती दिली. त्यानंतर झालेल्या स्पर्धेत विवीध वयोगटातील स्पर्धेत सुमारे एक हजार स्पर्धक सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने वणी पोलिस ठाण्याचे सपोनि सुनील पाटील यांच्यासह दहा पोलीस कर्मचारी तसेच डाॅ. प्रतिक बुरड यांच्यासह दहा कर्मचाऱ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.
या स्पर्धेतील विजेत्यांसह सौ. पल्लवी व श्री अश्विन गांधी, मुंबई यांना संयुक्तपणे समाज सेवेेेेतील योगदानासाठी, श्री. विठ्ठलतात्या संधान, चिंचखेड, ता. दिंडोरी यांना साहित्य व कृषी क्षेत्रातील योगदानासाठी व श्री दिपक जाधव रा. जोपुळ ता. चांदवड यांना हवामान तज्ज्ञ व अद्ययावत शेती क्षेत्रातील योगदानासाठी कार्यगौरव पुरस्काराने खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
यावेळी वणीचे उपसरपंच विलास कड, प्रा. अशोक बागुल, आंतरराष्ट्रीय धावपटु मंगला गावित, कृउबा सभापती प्रशांत कड, संजय कड, सपोनि मंगेश कड, सपोनि सुनिल पाटील, भास्कर फुगट, मेजर डाॅ. गोपाल शिंदे, डाॅ. प्रतिक बुरड, रतन गांगोडे, कांतीलाल कुंभार आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेंद्र उगले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानगंगा बहुद्देशिय संस्थेचे संस्थापक संपत जाधव, अध्यक्ष सचिन कड, ओजस आर्थरायटीस वऱ्हुमटोलाॅजीस्ट सेंटरच्या डाॅ. प्राची पाटील व सदस्यांनी परिश्रम घेतले.