नाशिक (प्रतिनिधी): पालिकेने लावलेल्या सत्तर हजार झाडांची नूतन आयुक्तांनी पर्यावरण प्रेमी संघटनांबरोबर पाहणी करावी यासाठी आज शहरातील विविध पर्यावरण संघटनांच्या प्रतिनिधींनी नूतन पालिका आयुक्तांची भेट घेतली. तब्बल 16 कोटी वार्षिक वृक्षबजेट असलेल्या उद्यान विभागाकडे सतत पाठपुरावा केल्यानंतरही शासकीय राजपत्रीत आदेशाप्रमाणे रस्त्याच्या कडेला विविध भारतीय प्रजातीच्या वृक्षलागवडीचा पालिकेकडून अजूनही मुहूर्त लागत नसताना ब्लॉग प्लँटेशनने सत्तर हजार झाडे लावण्याचा दावा उद्यान अधीक्षकांनी केला आहे. प्रत्यक्ष भेटून व माहितीच्या अधिकारातही उद्यान विभागाकडून याबाबत खुलासा होत नसताना खुद्द आयुक्तांनीच याबाबत माहिती द्यावी अशी मागणी नूतन आयुक्तांना भेटून आज पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आली.
शहरातील अवैध वृक्षतोडीस लगाम घालण्यासाठी वृक्षतोड नोटीस पालिकेच्या संकेत स्थळावर प्रसीद्ध करण्याचा, पालिकेकडुन लावण्यात आलेली विदेशी रोप काढून भारतीय प्रजातींच्या रोपांची लागवड करण्याचा व झाडांभोवतीचे काँक्रिटीकरण काढून मा. न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचा गेल्या अनेक दिवसांपासून पर्यावरण प्रेमींकडून पालिकेकडे पाठपुरावा केला जात आहे. नवीन इमारत बांधकामाने शहराचा विकास होत असताना पत्रे लावून अवैध वृक्षतोड न करता किमान मार्जीन स्पेस मधील पुरातन वृक्षसंपत्तीचे जतन करत बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम करावे व रहिवाशी इमारतीत कंपाउंड मध्ये नागरिकांनी, बांधकाम व्यावसायिकांनी झाडे लावून त्यांचे संगोपन करणे पालिकेने बंधनकारक करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत. वृक्षवाढीस अडथळा ठरणाऱ्या व विदयुत विभागाकडून होणारी झाडांची असमतोल छाटणीने होणारे अपघात टाळण्यासाठी नाशिकसारख्या स्मार्ट शहरातील विदयुत तारा भूमिगत करण्याचीही मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पर्यावरण प्रेमींनी केलेली आहे.
सिहंस्थ कुंभमेळ्याचे स्वागत हरित नाशिकच्या संकल्पनेने साजरे करण्यासाठी उद्यान विभाग अपयशी ठरत असेल तर शहरातील विविध सामाजिक संघटना हि जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याबाबतचे पर्यावरण प्रेमींनी निवेदनात म्हटले आहे. इंदोर पेक्षा स्वच्छ सुंदर शहर करण्याचा संकल्प घेतलेल्या मा.आयुक्तांनीच हरित नाशिकसाठी जातीने लक्ष देण्याचे साकडेच आज पर्यावरण प्रेमींनी आयुक्तांना घातले. याबाबतची सर्व माहिती घेवून पुन्हा चर्चा करण्याचे आश्वासन नूतन आयुक्तांनी पर्यावरण प्रेमींना दिलेले आहे. नवीन वर्ष व नवीन आयुक्त नाशिकची थंड हवेची ओळख पुनः मिळवून देण्यात यशस्वी ठरो अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून नवीन वर्षाचे व नूतन आयुक्तांचे स्वागत करताना व्यक्त केली जात आहे.