इलेक्ट्रिक बसेसच्या तुलनेत अधिक आसनक्षमता असल्याने नाशिकलाही होणार फायदा!
नाशिक ( प्रतिनिधी ): राज्य परिवहन (एसटी) महामंडळ सध्या वाहन खरेदीवर भर देत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात १२ मीटर लांबीच्या आणखी १०० ई-शिवाई गाड्या लवकरच दाखल होणार आहेत. सध्या मुंबई-पुणे मार्गावर धावणाºया इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत नव्या गाड्यांची आसनक्षमता अधिक आहे. त्यामुळे सणासुदीत प्रवाशांना आणखी बसेस मिळणार आहेत. नाशिक विभागालाही यातील काही बसेस उपलब्ध होणार आहेत.
एसटीने ५,१५० इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १३८ मिडी ई-बसेस यापूर्वी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मुंबई-पुणे मार्गावर धावणाºया ई-शिवनेरीच्या ताफ्यात मागच्या आठवड्यात १७ नव्या बसेस दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत या मार्गावर ८३ गाड्या होत्या. नवीन बसगाड्यांच्या समावेशामुळे ई-शिवनेरीची संख्या आता १०० वर पोहोचली आहे. त्यामुळे दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास करणा-या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाने भाडेतत्त्वावरील नवीन १३१० खासगी बसेसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई आणि पुणे विभागासाठी ४५०, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक विभागासाठी ४३०, तर अमरावती व नागपूर विभागासाठी ४६० नवीन बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापूर्वी महामंडळाने सुमारे ३५० बस भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. त्यांना प्रतिसाद मिळाल्यामुळे भविष्यात साध्या बसची कमतरता भरून काढण्यासाठी भाडेतत्त्वावर आणखी काही बस घेण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचाराधीन होता. शिवनेरी आणि शिवशाही या आरामदायी बससाठी भाडेतत्त्वावरील बस घेण्याचा प्रयोग यापूर्वी एसटी महामंडाने केला आहे. अशाच पद्धतीने खासगी संस्थेचा चालक, डिझेल आणि बसची तांत्रिक देखभाल करणे या अटीवर पुढील सात वर्षांसाठी या बसेस घेण्यात येणार आहे.
१२ मीटरच्या बसची आसनक्षमता ४५ प्रवाशांची आहे. सध्याच्या नऊ मीटरच्या बसची आसनक्षमता ३२ आहे. सध्या राज्यात १३६ ई-मिडीबस (नऊ मीटर लांबीच्या) धावत आहेत. या बसगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. नागपूर-चंद्रपूर या मार्गानंतर नाशिक-बोरीवली तसेच नाशिक-छत्रपती संभाजीनगर या मार्गावर या बसेस सुरू केल्या जाणार आहेत. या गाड्यांचे तिकीटदर सध्या चलनात असलेल्या ई-शिवाई बसेसप्रमाणेच ठेवण्यात येणार आहेत. यातून महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
– अरुण सिया, विभागीय अधिकारी, राज्य परिवहन, नाशिक