नाशिक शहरात बिजेपीच्या पहिल्या यादीत चार विद्यमान आमदारांना पुन्हा संधी!

नाशिक मध्य येथे नक्की कोण? भाजप गटात चर्चांना उधाण!

नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीचा आखाडा आता दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नाशिक पूर्वमधून अ‍ॅड. राहुल ढिकले, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, चांदवड-देवळा मतदारसंघातून डॉ. राहुल आहेर आणि बागलाणमधून दिलीप बोरसे यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली आहे. हे करतानाच नाशिक मध्यची जागा ही भाजपाकडे असूनही येथे विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली नाही. त्यामुळे येथील उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम आहे. आ. फरांदे यांना पक्षाच्या दुस-या यादीत समावेश करत उमेदवारी मिळणार की, पक्ष येथे भाकरी फिरवणार, याबाबत भाजपाच्या गटात आता चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीतील भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्यातील पक्षाच्या पाचपैकी चार विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देत निवडणूक रिंगणात उतरविले आहे. नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवार पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही जागा भाजपच्या मित्र पक्षांना सुटणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जिल्ह्यातील सहा जागा लढविल्या होत्या. त्यापैकी मालेगाव मध्यची जागा सोडली, तर उर्वरित पाच जागांवर पक्षाने विजय मिळविला होता. जिल्ह्यातील सहापैकी चार जागांवरील उमेदवार पक्षाने जाहीर केले असून, नाशिक मध्यबरोबरच मालेगाव मध्यचा उमेदवारही जाहीर करण्यात आलेला नाही. वास्तविक पाहता मालेगाव मध्यमध्ये पक्षाची ताकद नाही. त्यामुळे येथील उमेदवारीबाबत पक्षांतर्गत उत्सुकता नाही. मात्र, नाशिक मध्यबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली असून, उमेदवारी कोणाला? याबाबत भाजपच्या गटात चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!