नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागात अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू आहे. अतिदुर्गम डोंगराळ भागात गावठी दारू तयार करणे, अवैधरित्या दारूची वाहतूक करणा-या १३१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच १२ लाख ५० हजार ४०८ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. वणी पोलीस ठाणे हद्दीत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने अंकलेश्वरहून मालवाहू वाहनात शेतीकामासाठी वापरण्यात येणा-या जाळ्यांमध्ये लपवून गुटख्याची तस्करी करणा-यांवर कारवाई केली.
विधानसभा निवडणुकीमुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली असून, आचारसंहिता लागू झाल्यापासून मद्यसाठा, गुटखा यासह ६४ लाख ३४ हजार २७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यामध्ये २३ लाख,४० हजार रुपयांचा गुटखा आणि मालवाहतूक वाहन असा ४३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मालेगावजवळील पवारवाडी परिसरात आणि इतर ठिकाणी गुटखा वाहतूकसंदर्भात सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यात पाच लाख ४५ हजार ८६९ रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा आठ लाख ५३ हजार ८६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीन दिवसांच्या कारवाईत ६४ लाख ३४ हजार २७७ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
