कक्ष अधिका-यासह तिघांवर गुन्हा दाखल
नाशिक (प्रतिनीधी): महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक शुल्कातील तब्बल १ कोटी ५३ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांवर शुल्क घेण्याच्या प्रक्रियेत हा गैरप्रकार घडल्याचे विद्यापीठाच्या ऑडिटनंतर उघड झाले. याप्रकरणी परीक्षा विभागातील एक कक्ष अधिकारी, वरिष्ठ लिपिक आणि शिपाई अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी म्हसरूळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार बडतर्फ कक्ष अधिकारी विजय जोंधळे, वरिष्ठ लिपिक सुरेंद्र रोकडे आणि शिपाई अर्चना निकम यांनी विद्यार्थ्यांकडून ट्रान्सस्क्रिप्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नावातील सुधारणा, सत्यप्रत आदी प्रमाणपत्रांसाठी अधिकृत शुल्क स्वीकारले. मात्र विद्यापीठाच्या अधिकृत पावत्या न देता बनावट पावत्या देऊन रक्कम स्वतःच्या खात्यांत जमा केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांकडून जमा झालेली रक्कम विद्यापीठाच्या बँक खात्यात जमा करणे अपेक्षित असताना संशयित तिघांनी मिळून १ कोटी ५३ लाख १० हजार २०५ रुपये स्वतःच्या खात्यांमध्ये वळवून त्याचा अपहार केला. सप्टेंबर २०२३ पूर्वी हा संपूर्ण गैरप्रकार घडल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
कक्ष अधिकारी हे परीक्षा विभागातील अत्यंत जबाबदारीचे पद असून परीक्षांचे नियोजन व अंमलबजावणीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे अशा पदावरील अधिकाऱ्यानेच फसवणुकीत सहभाग घेतल्याने विद्यापीठ प्रशासनासह पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विद्यापीठाने केलेल्या चौकशीनंतर आरोपी कक्ष अधिकाऱ्याची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर तपासणी सुरू आहे. बनावट पावत्या कोठे छापल्या? पैसे कसे वळवले? आणखी कोणी सहभागी आहे का? या सर्व मुद्द्यांवर पोलिस तपास वेगाने सुरू असून पुढील चौकशीत आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणामुळे आरोग्य विद्यापीठाच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून विद्यार्थी व पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
