धुळे मनपात नोकरीचे आमिष; सहा लाखांची फसवणूक करणारा भामटा अटकेत

नाशिक : धुळे महापालिकेत शिपाई पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणीची लाखोंची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अखेर पोलिसांनी अटक केली. नाशिक शहर पोलीस यांच्या गुन्हे शाखेच्या अंबड युनिट–३ पथकाने ही धडक कारवाई धुळे शहरातील गुरुद्वार परिसरातील उड्डाणपुलाखाली सिनेस्टाइल पाठलाग करून केली. अटकेनंतर संशयितास सातपूर पोलिस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव जालिंदरनाथ अशोक मोरे (३२, रा. धुळे) असे आहे. याप्रकरणी ध्रुवनगर येथील नीलेश नामदेव तुपलोंढे यांनी फिर्याद दिली होती. तुपलोंढे यांच्या कुटुंबातील कांचन तुपलोंढे यांना धुळे महापालिकेत शिपाई पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष संशयिताने दाखविले होते.

जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत संशयिताने तुपलोंढे यांच्याकडून तब्बल ६ लाख १५ हजार ७०० रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतर त्याने धुळे मनपा आयुक्तांची बनावट स्वाक्षरी असलेले नियुक्तीपत्र कांचन तुपलोंढे यांना दिले. नियुक्तीपत्र घेऊन त्या हजर होण्यासाठी धुळे महानगरपालिका येथे गेल्या असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. संबंधित अधिकाऱ्यांनी पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केल्यावर फसवणुकीचा भांडाफोड झाला.

यानंतर नीलेश तुपलोंढे यांनी सातपूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. सातपूर पोलिस संशयिताचा शोध घेत असताना अंबड युनिट–३ चे प्रभारी उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना तो धुळ्यात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने धुळ्याकडे कूच केले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने पलायन केले. दरम्यान, तो सहा चाकी टँकरमध्ये बसून नाशिककडे पळ काढत असल्याची माहिती मिळताच पथकाने टँकरचा पाठलाग केला. गुरुद्वार परिसरातील उड्डाणपुलाखाली सिनेस्टाइल कारवाई करत संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप मिटके, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके व अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्यासह हवालदार प्रकाश बोडके, भूषण सोनवणे, अंमलदार चारूदत्त निकम व सविता कदम यांचा समावेश होता. पोलिसांकडून संशयिताची सखोल चौकशी सुरू असून, त्याने अशाच प्रकारे इतरांकडूनही पैसे उकळले आहेत का, याचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!