सिगारेटच्या 1 रूपायाच्या वादातील हाणामारीत गमावला जिव!

  • टपरीचालकाने एक रुपया जास्त घेतल्याचा जाब विचारणे ग्राहकाच्या जिवावर बेतले…
  • मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर होणार स्पष्ट!
नाशिक (प्रतिनिधी): बुधवारी (दि. २) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियमजवळ असलेल्या एका पान दुकानावर विशाल कृष्णा भालेराव (वय ५०, रा. पाथर्डी फाटा) सिगारेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी टपरीचालक बापू जगन्नाथ सोनवणे (वय ५९, शिवपुरी चौक) यांनी सिगारेटचे ११ रुपये मागितले. त्यावर भालेराव यांनी, सिगारेट सर्व दुकानांत १० रुपयांना मिळते, मग तुम्ही ११ रुपये का घेता, असा जाब विचारला. यातून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. संतप्त झालेल्या बापू सोनवणे यांनी भालेराव यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली.
भालेराव कामाच्या ठिकाणी परत गेल्यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचे मालकाच्या लक्षात येताच, त्यांनी भालेराव यांना खासगी रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करवून घेतले. भालेराव यांच्या डोक्याला तीन टाके घालण्यात आले. त्यानंतर भालेराव घरी गेले. संध्याकाळच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
पानटपरीवर सिगारेट घेतल्यानंतर टपरीचालकाने एक रुपया जास्त घेतल्याचा जाब विचारणे ग्राहकाच्या जिवावर बेतले. यावेळी झालेल्या वादातून टपरीचालकाने ग्राहकास मारहाण केल्यामुळे जखमी झालेल्या ग्राहकाने दवाखान्यात उपचार घेतले; परंतु, घरी गेल्यानंतर काही वेळाने त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अंबड पोलिसांत अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली असून,शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अंबड पोलिसांत प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतर त्यानुसार याबाबत सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!