नाशिक ( प्रतिनिधी): एलआयसीने प्लॉट लिलावात काढल्याची बतावणी करून प्लॉटविक्रीच्या बहाण्याने एलआयसी शाखा मॅनेजरसह दोघांनी एका महिलेकडून तब्बल ८ लाख १६ हजार रुपये घेतले, परंतु त्या बदल्यात प्लॉट महिलेच्या नावावर केला नाही. तसेच रक्कमही परत न करता फसवणूक करीत पैसे परत मागितल्याने धमकी दिल्याची तक्रार पिडित महिलने ओझर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ओझर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ जानेवारी ते १३ जून २०२४ या कालावधीत ही घटना घडली असून पिडित महिला सुनीता बाळासाहेब माने (रा. फ्लॉट नं ६/७, सिध्दीविनायक इंडस्ट्रिअल ईस्टेट, ओझर) यांनी संशयित उल्हास पंडीत (रा. इंंदिरानगर, नाशिक) व एलआयसी शाखा मॅनेजर महेंद्र जोशी (रा. गडकरी चौक, नाशिक) या दोघां विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, नआ आणि जोशी यांनी संगन्मत करून अनिल गोविंद कुलकर्णी (रा. जानोरी रोड, अमृतनगर मागे, ओझर शिवार) यांच्या मालकीच्या प्लॉटवर ‘बाणगंगा पतसंस्था, ओझर’ चा बोजा असल्याचे माहित असतानाही हा प्लॉट एलआयसीने लिलावात काढल्याचे माने यांना सांगितले. तसेच सदरचा प्लॉट लिलावात विक्री करण्याच्या बहाण्याने माने याच्याकडून ८ लाख १६ रुपयांची रक्कम घेतली. मात्र तो प्लॉट माने यांच्या नावावर केला नाही आणि माने यांची रक्कमही परत केली नाही, त्यामुळे माने यांनी संशयितांकडे पैशांची मागणी केली असताना त्यांनी धमकी देत फसवणूक केल्याचे माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार ओझर पोलीस ठाण्यात संशयित पंडीत व जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे हे करीत आहेत.
