विद्यार्थ्यांची बैलगाडी, ट्रॅक्टरमधून लेझीमच्या तालावर मिरवणूक
नाशिक (प्रतिनिधी) : दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर शनिवारी (दि. १५) जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची घंटा खणखणली आणि विद्यार्थ्यांनी जल्लोष करीत शाळेत प्रवेश केला. शालेय प्रवेशानिमित्त विद्यार्थ्यांची गावातून बैलगाडी व ट्रॅक्टरवरून लेझीमच्या तालावर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनही देण्यात आले. जंगी स्वागताबरोबरच पाठ्यपुस्तकेही मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेह-यांवर आनंद दिसून येत होता.
दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुटीनंतर शहरात शनिवार (दि. १६) पासून प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. शहरातील विविध शाळा व्यवस्थापकांकडून विद्यार्थ्यांच्या स्वागताची उत्तम तयारी करण्यात आली होती. शिक्षक, शिक्षिकांनी बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले.
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहावा, यासाठी शाळांकडून पहिल्या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बहुतांश शाळांत विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती असल्याची माहिती शाळा व्यवस्थापकांमार्फत देण्यात आली. उन्हाळी सुटीनंतर पुन्हा शाळेत येण्याचा उत्साह विद्यार्थ्यांच्या चेहºयांवर दिसून येत होता.
जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी कळवण तालुक्यातील अभोणा, तीरळ येथील जिल्हा परिषद शाळा येथे भेट देऊन शाळांमध्ये प्रथम दिवशी राबविण्यात येणा-या उपक्रमांचा आढावा घेतला. उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास विभाग प्रताप पाटील यांनी शाळा प्रवेशोत्सवप्रसंगी इनामबारी शाळेस भेट दिली. यावेळी गट शिक्षणाधिकारी प्रशांत जाधव, संदीप बिरारी, सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, मुख्याध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना आमरस-पुरणपोळीचे भोजनदापुरे, मालेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांतर्फे खास आमरस-पुरणपोळी, आमटी-भात, कुरडई, भजे असे मिष्टान्न भोजन देण्यात आले. स्वत: शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी भोजन वाढल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला. ज्येष्ठ नागरिक अभिमान पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वाल्मीक डामरे, शिक्षणप्रेमी इंजि. तुषार शिंदे, पालक सुनील पवार, चेतन सोनवणे, पंडित भदाणे,सागर मिसर, राजेंद्र डामरे, मुख्याध्यापक राजेंद्र दिघे, अंगणवाडी सेविका आदींच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. उपशिक्षक कन्हैया गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले, तर उपशिक्षिका भाग्यश्री पवार यांनी आभार मानले.
