अंबड (प्रतिनिधी): अंबड परिसरातील कृष्णानगर येथील श्री ज्वेलर्स येथे दुपारी 2 वाजेच्या दरम्यान पिस्तूलचा धाक दाखवत तिन दरोडेखोरांनी दरोडा टाकला यात सुमारे 25 ते तीस तोळे सोने चोरले दुकानतील सराफ व त्यांच्या पत्नीच्या तोडांवर गुंगीचा स्प्रे मारत दरोडेखोरांनी पळ काढल्यची घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्री ज्वेलर्स चे मालक व त्यांच्या पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवून ‘शांत बसा, नाही तर इथेच गोळ्या घालेन’, असे म्हणत संशयितांनी यावेळी सुमारे पंचवीस ते तीस तोळे वजनाचे दागिने घेऊन पलायन केले. या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊली लॉन्स ते प्रणय स्टम्पिंग रस्त्यावर महालक्ष्मीनगर, कृष्णा नगर (अंबड) येथील मुख्य रस्त्यालगत श्री ज्वेलर्सचे दुकान आहे. सोमवार दुपारी दोन वाजेच्या सुमारास माऊली लॉन्सकडून बुलेटवर तोंडाला रुमाल बांधून तीन जण दुकानाजवळ आले. यातील एक जण बुलेट घेऊन पुढे गेला. यानंतर उरलेल्या दोन दरोडेखोरांनी आजूबाजूला रेकी करून दुकानात प्रवेश केला.
दुकानात बसलेले दुकानाचे मालक घोडके यांच्यावर एकाने पिस्तूल रोखले, तर दुसºयाने त्यांच्या पत्नीला बाजूला केले. आरडाओरड करू नका, अन्यथा नाही तर इथेच गोळ्या घालू’, अशी धमकी देत संशयितांनी काउंटरमध्ये ठेवलेले तीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पिशवीत भरून पलायन केले. यानंतर दरोडेखोरांनी घोडके पती-पत्नीच्या तोंडावर कुठल्या तरी औषधाचा स्प्रे फवारून दुकानातून पळ काढला. काही काळानंतर घोडके यांना शुद्ध आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली.
दरोडा पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. घटनास्थळी श्वान पथक देखील आले होते. घटनास्थळावरून संशयित दरोडेखोरांचे ठसे घेण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. पुढील तपास अंबड पोलिस करत आहे.