नाशिक : तालुक्यातील दरी गावात शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या पथकाने बुधवारी (दि. २५) धाडसी व यशस्वी सुटका केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरी येथील शेतकरी छगन मंगळू आचारी यांनी सकाळी शेतातील मोटार सुरू करण्यासाठी विहिरीजवळ जात असताना त्यांना आतून बिबट्याची डरकाळी ऐकू आली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या पाण्यात अडकलेला दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती परिसरातील नागरिकांना व वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने विशेष पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. काही वेळ प्रयत्नांनंतर बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि त्याला सुरक्षितपणे वर काढण्यात आले. वनअधिकाऱ्यांनी बिबट्याची प्राथमिक तपासणी करून तो सुखरूप असल्याची खात्री केली. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्याला योग्य त्या ठिकाणी हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून दरी परिसरात बिबट्याच्या संचाराच्या अफवा पसरल्या होत्या. या घटनेमुळे त्या चर्चांना दुजोरा मिळाला असला तरी वनविभागाने नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, अशी सूचना केली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल ग्रामस्थांनी वनविभागाचे आभार मानले.
