नाशिक (प्रतिनिधी): नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये कुंभमेळा भरत आहे. यादृष्टीने नाशिक महापालिकेने ७,७६७ कोटींचा, तर उर्वरित विभागांनी ७५०० कोटी असा एकत्रित सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांचा ढोबळ आराखडा तयार केला असून, या आराखड्याचे सादरीकरण राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासमोर करण्यात आले. संबंधित आराखड्याच्या माध्यमातून संपूर्ण शहराचाच विकास होणार असल्याने शहराऐवजी कुंभमेळ्यासाठी आवश्यक परिसर, तसेच विभागांशी संबंधितच आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी यंत्रणांना दिले आहेत. यामुळे कुंभमेळा आराखड्याला पुन्हा कात्री लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला मागील वर्षी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने महापालिकेने प्रशासकीय पातळीवर आपल्या सर्वच विभागांकडून प्रस्तावित कामे, तसेच किती निधी लागू शकतो, याविषयीचा सिंहस्थ आराखडा तयार केला आहे. महापालिकेच्या विविध विभागांनी मागणी नोंदविल्याने पहिल्या टप्प्यात मनपाचा आराखडा १७ हजार १०० कोटींवर गेला होता. मात्र, आराखडा जिल्हा प्रशासनाकडे सादर झाला तेव्हा जिल्हाधिकारी जलज शर्मा व विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मनपाला केवळ महत्त्वाची व प्राधान्यक्रमानुसारच कामे आराखड्यात सुचविण्यास सांगत निधीची कपात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेचा आराखडा आता सात हजार ७६७ कोटींपर्यंत खाली आला आहे, तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, जलसंपदा, नाशिक महानगर विकास प्राधिकरण यासह विविध विभागांनीही साडेसात हजार कोटींचा आराखडा सिंहस्थासाठी तयार केला आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी महापालिकेसह सर्व विभागांचा आराखडा हा पंधरा हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे.