नाशिकच्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे गेला महिलेचा जिव!

पंचवटी (प्रतिनिधी): शहरात घटस्थापनेच्या दिवशी घरोघरी घट बसविण्यासाठी लगबग सुरू असताना, जत्रा हॉटेल परिसरात दुचाकीवरून प्रवास करणा-या सविता संजू शिरसाट (वय ५०, रा. रॉयल रेसिडन्सी) यांचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात झाला. या अपघातात गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेकडे मनपाच्या दुलक्षामुळे हा अपघात होऊन शिरसाठ यांचा बळी गेल्याची प्रतिक्रिया त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सविता शिरसाट गुरुवारी (दि. ३) सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास आडगाव शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावरील डी-मार्टकडून सीबीएसच्या दिशेने आपल्या मुलासमवेत दुचाकीवरून प्रवास करीत होत्या. हॉटेल जत्रा परिसरात रस्त्यातील एका खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळल्याने पाठीमागे बसलेल्या सविता शिरसाट खाली पडल्या. यावेळी त्यांच्या तोंडाला व डोक्याला गंभीर दुखापत होऊन, नाकातून व कानातून रक्तस्राव झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी (दि. ५) उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला असल्याची चर्चा सुरू असून, नागरिकांमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार राकेश बनकर तपास करीत आहेत.
पावसाळ्यात शहरासह परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. नाशिक महापालिकेने केवळ वरच्यावर मलमपट्टी केल्याने खड्डे ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत पावसाने उघडीप दिल्यानंतरही प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतलेले नाही.
रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार आहे. रस्त्यांच्या बाबतीत कामचलाऊपणा करणा-या ठेकेदारांवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया सविता शिरसाट यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!