नाशिक (प्रतिनिधी): शहरात अवैधपणे गुटख्याचा साठा करून विक्री करणाऱ्या दोन साठेबाजांवर छापा टाकण्यात आला. पखालरोड आणि अंबड येथील दोन घरांवर छापा टाकून चार लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षक सुवर्णा महाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पखाल रोडवर व्यंकटेश पार्क येथे संशयित धीरज कोठावदे याच्या घरी अवैध गुटखा साठा असल्याची माहिती मिळाली पथकाने पोलिसांच्या मदतीने घरावर छापा टाकत गोण्यात गुटखा मिळून आला. संशयिताकडून २ लाख १२ हजारांची गुटखा जप्त केला. विभागाच्या दुसऱ्या पथकाच्या अन्न सुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुधीर सोनजे (रा. गुलमोहर कॉलनी, डीजीपीनगर २, अंबड) यांच्या दुकानात गुटखा साठा असल्याची माहिती मिळाली. पथकाने पोलिसांच्या मदतीने न्यु साईराज प्रोव्हीजन शॉप येथे छापा टाकला. दुकानातून १ लाख ७२ हजारांचा गुटखा जप्त केला. संशयितांच्या विरोधात अन्न व सुरक्षा मानके कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.