नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; अश्विनी देवरे यांनी आफ्रिकेत ९० किमी अंतर ११ तास ४८ सेंकदात केले पार

‘द कॉम्रेड्स मॅरेथॉन’ पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला पोलिस कर्मचारी

नाशिक (प्रतिनिधी): येथील माहेरवाशीण असलेली उत्कृष्ट धावपटू अश्विनी शेवाळे-देवरे हिने दक्षिण आफ्रिकेतील ‘द कॉम्रेड्स मॅरेथॉन” ही ९० किमी धावण्याची स्पर्धा खडतर व प्रतिकूल वातावरणात यशस्वीरीत्या पूर्ण करीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. दोन वर्षांपूर्वी कझाकस्तान येथील आयर्न मॅन स्पर्धेत नाशिक पोलिस दलाचे नाव कोरल्यानंतर पुन्हा ही यशस्वी कामगिरी बजावल्यामुळे देशभरातील पोलिस दलामध्ये अश्विनी देवरे या अशी कामगिरीची नोंद करणाऱ्या एकमेव महिला पोलिस कर्मचारी ठरल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेत ९० किलोमीटर धावण्याची ‘द कॉम्रेड‌स मॅरेथॉन’ सोमवारी (दि. १०) पार पडली. नाशिक शहर पोलिस दलामध्ये महिला हवालदार असलेल्या अश्विनी देवरे यांनी जानेवारी महिन्यापासून या स्पर्धेची तयारी सुरू केली होती. अथक परिश्रम घेतल्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील या स्पर्धेत सहभाग घेतला. ९० किमी अंतर धावण्याच्या या स्पर्धेमध्ये अश्विनी देवरे यांनी ११ तास ४८ सेंकदामध्ये हे अंतर यशस्वीरीत्या पार केले. ही स्पर्धा पार करणाऱ्या देशभरातील पोलिस दलातल्या त्या पहिल्या महिला पोलिस कर्मचारी ठरल्या आहेत. यामुळे नाशिक शहर पोलिस दलाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा कोरले आहे.

रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत केला धावण्याचा सराव अश्विनी यांनी या स्पर्धेचे ठिकाण आणि तेथील वातावरण थंड असल्याने त्यासाठी त्यांनी नाशिक ते त्र्यंबकेश्वर, नाशिक ते सिन्नर, नाशिक ते देवळाली कॅम्प व परिसरात रात्रीच्या वेळी धावण्याचा सराव केला. रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत त्या धावण्याचा सराव एकट्याने करीत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!