परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता!

नाशिक (प्रतिनिधी): पुढील पाच दिवसांचा अंदाज लक्षात घेता बुधवार दि. ९ ते १३ ऑक्टोंबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पाच दिवस हवामान थोडे उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस अंशत: ढगाळ ते ढगाळ राहील. कमाल तापमान ३३-३४ अंश सेल्सिअस  व किमान तापमान २२-२३ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वा-याचा वेग ६-११ कि.मी/तास राहील, असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी वर्तविला आहे.
गुरुवारी (दि. १०) व शुक्रवारी (दि. ११) खान्देश, नाशिक, नगर, पुणेसह १० जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते. गेल्या चार दिवसांपासून नंदुरबारमध्ये खिळलेला परतीचा पाऊस येत्या दोन-तीन दिवसांत म्हणजेच १० ऑक्टोंबरच्या सुमारास महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविली आहे. पाच दिवसांच्या आवर्तनात पडणा-या पावसाचे प्रमाण फारसे नसले तरी हा पाऊस धोपटणी स्वरूपाचा व जमिनीला जाड कडक खपली आणणारा पाऊस असू शकतो. या झोडपणी पावसामुळे फ्लॉवरिंगमधील द्राक्षबागांची फुलझड व पोंग्यातील बागांच्या कोंबांना इजा पोहोचू शकते. विशेषत: सध्या नुकतीच आगाप पेर झालेला हरबरा किंवा उभी असलेली लाल कांद्याची रोपे, तसेच आगाप टाकलेले व उगवणीच्या स्थितीत असलेली उन्हाळ गावठीची रोपे यांना पावसामुळे बाधा होऊ शकते. कोजागरी पौर्णिमा ते नरक चतुर्दशी (दि. १५ ते दि. ३१ ऑक्टोंबर) दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून विजा व ढगांच्या गडगडाटासह केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते. ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यातील पावसाच्या दुस-या आवर्तनात पाच दिवस (दि.२२ ते २६) पावसाची शक्यता वाढली आहे. हे आवर्तन कदाचित नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही टिकण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही खुळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!