नाशिक जिल्ह्यात ७०० द्राक्ष उत्पादकांची व्यापा-यांकडून कोट्यवधींचा चुना

द्राक्ष बागायतदार संघाकडे तक्रारी; शेतक-यांची अजित पवारांकडे धाव

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात द्राक्ष उत्पादक शेतक-यांची दरवर्षी व्यापा-यांकडून फसवणूक केली जात आहे. द्राक्ष उत्पादक शेतक-यांनी महाराष्ट्र राज्याच्या द्राक्ष बागायतदार संघाकडे या संदर्भात तक्रारी केल्या आहेत, तर काही शेतक-यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. द्राक्ष व्यवहारातील पैशांची फसवणूक झाल्याची लेखी स्वरूपात तक्रारी आणि निवेदन द्राक्ष बागायतदार संघाकडे प्राप्त झाले असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातून ७०० अर्ज द्राक्ष बागायतदार संघाकडे प्राप्त झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांची वर्षानुवर्ष व्यापा-यांकडून फसवणूक केली जाते. यंदाही ७०० शेत-यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी द्राक्ष बागायतदार संघाकडे प्राप्त झाले आहेत, तर इतर शेतक-यांनी संबंधित पोलीस ठाण्यात लेखी अर्जही दाखल केले आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक द्राक्ष उत्पादक शेतकरी असून, या शेतक-यांना कोटींचा गंडा घालून व्यापारी पळून गेले असून, गेल्या दोन वर्षांपासून शेतक-यांना विकलेल्या द्राक्ष मालाचा परतावा मिळाला नसल्याने शेतक-यांनी आता द्राक्ष बागायतदार संघाकडे आपले गा-हाणे मांडले आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील भेट घेतली होती. मात्र, अद्याप पोलीस प्रशासनाकडून फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतक-यांना कोणतीही मदत होत नसल्याचे म्हटले आहे.
वारंवार द्राक्ष उत्पादक शेतक-यांच्या फसवणुकीच्या घटना बघता द्राक्ष उत्पादक शेतकरी जगावा, यासाठी सरकारने तत्काळ योग्य ते पाऊल उचलावे आणि द्राक्ष उत्पादक शेतक-यांच्या फसवणूक थांबविण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी केली आहे. नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादक शेतक-यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक द्राक्षाचे उत्पन्न नाशिक जिल्ह्यात घेतले जातात. त्यामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यात जवळपास ५० ते ७० कोटींची फसवणूक करून व्यापारी पळून गेले असल्याची माहिती नाशिक द्राक्ष बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गडाख यांनी दिली. शेतक-यांकडे पुरावे नसल्यामुळे आणि शेतकºयांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोपही द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!