नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील स्थायी पदांवरील जवळपास ११० अधिकारी व कर्मचारी पुढील २०२५-२६ या वर्षात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे आधीच मनुष्यबळाची वाणवा असलेल्या महापालिकेत कर्मचा-यांची संख्या आणखी कमी होणार असल्याने महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांची रखडलेली नोकरभरती कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर जवळपास सात हजार २०० कर्मचारी, अधिकाºयांची पदे मंजूर आहेत. यापैकी आजमितीस जवळपास साडेचार हजार इतकेच मनुष्यबळ महापालिकेत कार्यरत आहेत. महापालिकेत गेल्या १५ ते २० वर्षात सरळसेवेने नोकरभरती कधीच झाली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्मचा-यांची कमतरता जाणवत आहे. तुटपूंज्या कर्मचा-यांच्या माध्यमातून मनपा प्रशासन काम करून घेत आहे. यामुळे इतर कर्मचारी व अधिका-यांवर कामकाजाचा ताण निर्माण होत आहे. नाशिक शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नव वसाहती आणि कॉलनींच्या ठिकाणी सेवा सुविधा पोहोचविण्यात अनेक अडचणींचा सामना मनपा कर्मचारी व अधिकाºयांना करावा लागत आहे.
कोरोना काळात तर मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवली. त्यामुळे किमान महत्वाच्या व अत्यावश्यक पदांची भरती करण्यास राज्य शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यामुळे २०२३-२४ या वर्षात शासनाने महापालिकेच्या आस्थापना खर्चाची मर्यादा शिथील करीत एका वर्षाच्या आत अग्निशमन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग व आरोग्य वैद्यकीय विभागातील जवळपास साडेसहाशे पदांची भरती करण्यास परवानगी दिली. मात्र या कालावधीत ही भरतीच होऊ शकली नाही. एक वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने शासनाने दिलेली परवानगी देखील संपल्याने नोकर भरती रखडून पडली आहे. त्यास राज्य शासनाकडून मान्यता मिळावी, अशी मागणी मनपाने केली आहे. मात्र हा प्रस्ताव भिजत पडला आहे.
