नाशिक (प्रतिनिधी): ध्वनिप्रदूषण विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन गुन्हे पोलीस दप्तरी दाखल करण्यात आले असून, विनापरवानगी मिरवणूक काढल्याप्रकरणी सध्यातरी एका मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोणत्या मंडळांनी विनापरवाना मिरवणूक काढली याबाबत पोलिस सुत्रांकडून आजून तपास सुरू आहे.
तसेच गणेश मंडळांच्या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी नियमांच्या मर्यादेत आवाजाच्या भिंती उभारण्यास मुभा दिली होती. त्यामुळे राजकीय पक्षांशी संबंधित मंडळांनी मिरवणुकीत या वाद्याला पसंती दिल्याचे पहायला मिळाले. जेलरोडचा राजा मित्र मंडळाने आवाजाच्या भिंती उभारून मिरवणूक काढली. ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन केले नाही. या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गामणे, सुमित साठे यांच्यासह ध्वनी यंत्रणेचा चालक उमेश कुमावत यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मुख्य मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी युनायटेड महिला सोशल फाउंडेशनच्या पदाधिका-यांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश मंडळांच्या स्वागतासाठी या फाउंडेशनने स्वागत कक्ष उभारला होता. तिथे ध्वनिप्रदूषण विषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नाशिकरोड भागात सैलानी बाबा येथील हिंद शक्ती मित्र मंडळाने विनापरवानगी मिरवणूक काढली. ध्वनी यंत्रणेचा वापर केला. या प्रकरणी मंडळाचे मंगेश गवारे, विवेक बेग यांच्यासह ध्वनि यंत्रणेचा चालक शुभम बर्डे यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
