नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त या प्रमुख कुंडासह गंगासागर, गौतम तलाव, प्रयागतीर्थ, इंद्रकुंड यातील काही निवडक कुंडांचे मूळ सौंदर्य अबाधित राखून आगामी कुंभमेळ्यासाठी नूतनीकरणाचा मानस गुरुवारी (दि. ६) प्रशासकीय अधिका-यांच्या पाहणी दौ-यात व्यक्त करण्यात आला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यास अवघ्या दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. या अनुषंगाने गुरुवारी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस उपअधीक्षक वासुदेव देसले, प्रांताधिकारी ओमकार पवार, तहसीलदार श्वेता संचेती यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के आदींनी त्र्यंबकेश्वरचा पाहणी दौरा केला. मागील सिंहस्थात अहिल्या-गोदा संगम येथे घाटांची बांधणी करण्यात आली होती. हे घाट काँक्रिटीकरणमुक्त करून दगडी पायºयांच्या माध्यमातून पर्यायी स्नानाची व्यवस्था करता येईल का, यावर विचार करण्यात आला. त्र्यंबकेश्वरमध्ये साधारणत: ३० एकर क्षेत्रावर साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे. या जागेसह तळवाडे, पहिणे व अंबोली येथील वाहनतळाच्या जागेसह शाही मिरवणुकीचा मार्ग आदींची पाहणी करण्यात आली. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या जुन्या इमारतींचा उपयोग करता येईल का, यावर विचार झाला. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी होणा-या गर्दीच्या काळात काय नियोजन करता येईल, यावर प्रशासकीय पातळीवर चर्चा झाली, तसेच गेडाम यांनी शहरातील अरुंद रस्त्यांची पाहणी करत अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या.
