नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेचे विविध कर अदा न करणा-या बड्या थकबाकीदारांना आता ‘अभय’ मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत. यापुढील काळात बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची पावले महापालिका प्रशासनाकडून उचलली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. घरपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना लागू केली. त्यासाठी थकीत घरपट्टीवरील शास्ती अर्थात दंडाच्या रक्कमेत ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये ९५ टक्के तर जानेवारीत ८५ टक्के सवलतही देण्यात आली. मात्र, या योजनेनंतरही थकबाकी पाहिजे तेवढ्या प्रमाणात होऊ न शकल्याने आता महापालिका बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणार आहे.
घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने ऑक्टोंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत अभय योजना लागू केली होती. या योजनेअंतर्गत तब्बल ६५ हजार ७३३ थकबाकीदार मिळकतधारकांनी लाभ घेतला. तब्बल ३२.६४ कोटींची दंडमाफी संबंधितांना मिळाली. योजनेतून महापालिकेची ६६ कोटी ९३ लाखांची थकबाकी वसुल झाली. या योजनेत पंचवटी विभागातील सर्वाधिक १५ हजार ८५६ थकबाकीदारांनी सहभागी होत १४.३८ कोटींची थकीत घरपट्टी जमा केली. त्याखालोखाल सिडकोतील १५ हजार ५३२ थकबाकीदारांनी १२.७७ कोटी, नाशिक पूर्व विभागातील ११ हजार ४०३ थकबाकीदारांनी १३.९५ कोटी, नाशिकरोड विभागातील १० हजार २७१ थकबाकीदारांनी १०.१९ कोटी, सातपूर विभागातील ८ हजार ४७५ थकबाकीदारांनी ६.७१ कोटी, तसेच नाशिक पश्चिम विभागातील ४ हजार १९६ थकबाकीदारांनी ८ कोटी ९१ लाखांची थकबाकी भरली. या माध्यमातून या थकबाकीदारांनी तब्बल ३२.६४ कोटींची दंडमाफी मिळाली आहे. आता मुदत संपल्यानंतर थकबाकी न भरणा-या मिळकतधारकांच्या मालमत्ता जप्त करून सातबारा उता-यावर थकबाकीचा बोजा चढविला जाणार आहे.
