मद्याच्या नशेत धारदार कोयत्याने केली पत्नीची हत्या

नाशिक येथील गंगापूर रोडवरील धक्कादायक प्रकार
नाशिक (प्रतिनिधी): कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार गंगापूररोडवरील डी.के.नगर भागात उघडकीस आला. मद्याच्या नशेत धारदार कोयता डोक्यात मारल्याने महिलेचा मृत्यू झाला असून, संशयित पती पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता छत्रगुन गोरे (वय ४५, रा. डी.के.नगर) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. गोरे कुटुंबिय येथे भाडेतत्वावर राहतात. त्यांचे अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याचे नियोजन असल्याने दाम्पत्याकडून मंगळवारी (दि.४) दुपारच्या सुमारास संसारोपयोगी साहित्याची आवरसावर सुरू होती. यावेळी किरकोळ कारणातून गोरे दाम्पत्यात वाद झाला. मद्याच्या नशेत असलेल्या छत्रगुन मुरलीधर गोरे (५०) याने सविता गोरे यांच्या डोक्यात प्रथम कुकरच्या झाकणाने हल्ला केला. त्यानंतर धारदार कोयत्याने डोके, पाठ व पायावर सपासप वार केले. त्यामुळे रक्तंबबाळ अवस्थेतील सविता गोरे या पलंगावर पडल्या. त्यांची मुलगी मुक्ता बालाजी लिखे या घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुक्ता यांनी बराच वेळ दरवाजा वाजविल्यानंतर तिच्या वडिलांनी दरवाजा उघडत धुम ठोकली. मुक्ता लिखे यांनी घरातील प्रकार पाहिल्यानंतर हंबरडा फोडल्याने शेजाºयानी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरिक्षक सुशील जुमडे व निरिक्षक जग्वेंद्रसिंह राजपुत यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले. पथकांनी पाहणी करीत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात रवाना केला. याबाबत मुक्ता लिखे यांच्या फियार्दीनुसार छत्रगुन विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!