डाऊन सिंड्रोम मुलांसाठी नाशिकमध्ये २१-२२ मार्चला विशेष वैद्यकीय मार्गदर्शन शिबिर

नाशिक (प्रतिनिधी): जन्मत: गतिमंद असलेल्या डाऊन सिंड्रोमग्रस्त मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, अत्याधुनिक उपचार पद्धतींची माहिती आणि पुनर्वसनाच्या नव्या दिशा समजावून देण्यासाठी नाशिकमध्ये २१ व २२ मार्च रोजी दोन दिवसीय विशेष वैद्यकीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

डाऊन सिंड्रोम केअर असोसिएशन, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल जेनेटिक्स आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर मुक्त विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे. या उपक्रमामध्ये देशभरातील तज्ज्ञ डॉक्टर, मेडिकल जेनेटिसिस्ट, संशोधक तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये बालरोगतज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, जेनेटिक तज्ज्ञ आणि पुनर्वसन क्षेत्रातील विशेषज्ञांकडून मुलांची तपासणी करून त्यांना योग्य उपचार व पुढील काळातील काळजीबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे.

तसेच, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले असून नव्या जनुकीय संशोधन, अत्याधुनिक निदान पद्धती आणि उपचारांतील नव्या संकल्पनांबाबत सखोल माहिती दिली जाणार आहे. या माध्यमातून डॉक्टरांना अद्ययावत ज्ञान मिळून डाऊन सिंड्रोम मुलांच्या उपचारात अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे. पालकांसाठी आयोजित करण्यात आलेले मार्गदर्शन सत्र हे या शिबिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. या सत्रामध्ये मुलांचे संगोपन, मानसिक व शारीरिक विकास, शिक्षणाच्या संधी, तसेच पुनर्वसनाच्या विविध पद्धती याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या विकासासाठी योग्य दिशा मिळण्यास मदत होणार आहे.

डाऊन सिंड्रोमसारख्या स्थितीबाबत समाजामध्ये जागरूकता वाढवणे, लवकर निदान आणि योग्य उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या परिषदेत देशभरातील पालक व डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी होणार असून हा उपक्रम नाशिकसाठी वैद्यकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती मेडिकल जेनेटिसिस्ट तसेच डाऊन सिंड्रोम केअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ज्ञानदेव चोपडे यांनी दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क: ९८२२८ ८५५५८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!