पिण्याचे आर.ओ. देखील बंद अवस्थेत; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर
नाशिक (प्रतिनिधी) : कमटवाडे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक विद्यालय (शाळा क्र. ८०) परिसरातील स्वच्छतागृहाची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली असून, गेल्या अनेक वर्षांपासून हे स्वच्छतागृह पूर्णतः निष्क्रिय अवस्थेत धुळखात पडलेले आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांसाठी उभारण्यात आलेल्या या सुविधेचा सध्या कोणताही उपयोग होत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर स्वच्छतागृह शाळेच्या मुख्य रस्त्यालगत असल्यामुळे त्यावर आवश्यक नियंत्रण राहिले नाही. परिणामी, शाळेतील विद्यार्थ्यांऐवजी बाहेरील नागरिकांकडून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. सुरुवातीला ही बाब किरकोळ वाटत असली तरी कालांतराने स्वच्छतेचा अभाव, नियमित देखभालीचा अभाव आणि अनधिकृत वापर यामुळे स्वच्छतागृहाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत गेली. अखेर काही महिन्यांतच हे स्वच्छतागृह पूर्णतः बंद पडले असून, सध्या एकही बाथरूम वापरण्यायोग्य स्थितीत नाही.
स्वच्छतागृह वापरण्यायोग्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा वापर पूर्णतः बंद केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या आत असलेल्या मर्यादित (केवळ दोनच) स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, परिसरातील काही नागरिकांकडून दिवसाढवळ्या उघड्यावर लघुशंका केल्याचेही प्रकार घडत असल्याने शाळेच्या परिसराची स्वच्छता आणि शिस्त धोक्यात आली आहे.
शाळेजवळच सांडपाण्याचा नाला असल्याने आधीच परिसरात अस्वच्छतेचे वातावरण आहे. त्यातच स्वच्छतागृहाची दुरवस्था आणि साचलेली घाण यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे डासांची उत्पत्ती वाढून विद्यार्थ्यांमध्ये आजार पसरू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका नाकारता येत नाही.
सदर बाब लक्षात घेता शाळेच्या मुख्याध्यापिकांनी नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विशेषतः, निष्क्रिय व धोकादायक ठरलेले हे स्वच्छतागृह तात्काळ हटवून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शालेय वर्ग, वाचन कक्ष किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्टेज उभारण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे शाळेचा परिसर सुशोभीत होईल आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व उपयुक्त सुविधा उपलब्ध होतील, असे नागरिकांचे मत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित असलेला हा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, याकडे नाशिक महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा, याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर तसेच शाळेच्या एकूण वातावरणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते, याकडे पालक, नागरिक आणि शिक्षकवर्गाचे लक्ष लागले आहे.
शाळेत विद्यार्थ्यांसाठी बसविण्यात आलेले आर.ओ. (पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र) देखील सध्या बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. स्वच्छतागृहासोबतच पिण्याच्या पाण्याची ही समस्या विद्यार्थ्यांसाठी दुहेरी संकट ठरत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन आवश्यक ती दुरुस्ती व उपाययोजना करण्यात येईल.
– शरदभाऊ फडोळ, नगरसेवक, प्रभाग क्र.28
