- थंडीचा परिणाम : लहान मुले, ज्येष्ठांना त्रास्त; सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ
- निफाड ८.० तर नाशिक १०.१ तसेच मालेगावचा पारा ११ अंशांवर
नाशकात थंडीचा जोर वाढताच सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. खासगी, सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसत असून त्यात लहान मुले आणि वृद्धांचे प्रमाण अधिक जाणवत आहे. सर्दी, खोकल्यामुळे नागरिकांना कफाचा त्रास जाणवत आहे. बालमृत्यूच्या घटनेनंतर अनेक राज्यांनी काही कफ सिरपवर बंदी घातली आहे. तेव्हा लहान मुलांना गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला दिला जात आहे. लहान मुले वातावरणातील गारठा फारसा सहन करू शकत नाहीत. यामुळेच हिवाळ्यात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना ताप, खोकला, सर्दी, कफ असे आजार होतात. तेव्हा रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
नाशिक (प्रतिनिधी): गत आठवडाभरापासून नाशिक, निफाड व मालेगाव परिसरात तापमानाचा पारा घसरत आहे. रविवारी (दि. १६) नाशिक शहरात किमान १०.१, निफाडमध्ये ८.०, तर मालेगावी ११.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे निफाडचे तापमान हंगामातील नीचांकावर पोहोचले आहे. दरम्यान, आगामी तीन दिवसांत जिल्ह्यात थंडीच्या लाटेसह पावसाचाही इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावलाय व त्याची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.
शेतकरी धास्तावला: पुढील काही दिवसांतील पहाटेचे किमान व दुपारचे कमाल असे दोन्हीही तापमान घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसर परत्वे किमान तापमान ८ ते १०, तर कमाल तापमान २२ ते २५ अंशांवर खाली येण्याचा अंदाज हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. मागील दोन-तीन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले असताना आता पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी उत्पादक शेतकºयांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पावसानंतर थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले.
मुलांच्या शरीरातील पाणी कमी झाले हे ओळखण्याचे एकमेव साधन म्हणजे त्यांच्या लघवीचा रंग. अतिशय हलक्या, फिकट रंगाची लघवी होणे याचा अर्थ शरीराला आवश्यक तितके पुरेसे पाणी मिळत आहे. याउलट, गडद पिवळा रंग असेल तर पाण्याची कमतरता आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे. सध्या वातावरणात बदल होत असल्यामुळे साधे अन्न घ्यावे, पाणी गरम करून प्यावे. गरम पाण्याची वाफही परिणामकारक आहे.
– डॉ. विकास गोगटे, नाशिक.
