प्रतिनिधी (नाशिक): नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेत शनिवारी (दि.१५) सायंकाळी सहाला जागतिक मल्लखांब दिन साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मल्लखांब या खेळाची सुरुवात वणी येथे झाली. दुसरे बाजीराव पेशवा यांचे क्रीडा प्रशिक्षक बाळंभट दादा देवधर यांनी मल्लखांबची सुरुवात केली. निफाडमधील कोठुरे या गावी गोदातीरी ते राहत होते.
मल्लखांब हा भारतीय मराठमोळा खेळ आज २४ देशात खेळला जातो. २०१९ पासून सुरू झालेल्या खेलो इंडिया, युथ गेम, नॅशनल गेम स्पर्धेत पहिल्यांदा मल्लखांब खेळाचा सहभाग करण्यात आला. मल्लखांबाचे अढी, तेढी, बगली, सुईदोरा, फिरकी, झाप असे १६ विविध प्रकार आहेत. पुरलेला मल्लखांब, टांगता मल्लखांब व दोरीवरचा मल्लखांब अशा एकूण तीन प्रकारात मल्लखांब खेळला जातो. याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यशवंत जाधव, उल्हास कुलकर्णी यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ मल्लखांबपटू आबासाहेब घाडगे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
