गावठाणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावा; खासदार वाजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी दिल्या सूचना!

मंगेश ताकाटे,
नाशिक :
इगतपुरी तालुक्यातील नागोसली, वैतरणा, शिदवाडी या ठिकाणी रखडलेल्या पुनर्वसन गावठाणाबाबत खा. राजाभाऊ वाजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्हाधिकारी जलल शर्मा यांना त्वरित कार्यवाहीसाठी सूचना केली. नागोसलीचे सरपंच काशीनाथ होले, उपसरपंच अशोक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश धापटे, चंदर गिहे, सुमन मुर्तडक यांनी खा. वाजे यांच्याकडे गावठाणाचा प्रश्न मांडला होता.

नागोसली, शिदवाडी, वैतरणा येथील शेतजमिनी १९६९-७० मध्ये वैतरणा धरणासाठी संपादित असून, या गावांचे पुनर्वसन पाटबंधारे विभागाने संपादित केलेल्या जागेत करण्यात आले. परंतु, पुनर्वसन झाल्यापासून आजपर्यंत गावांना अधिकृत शासकीय गावठाण उपलब्ध नाही. त्यामुळे विविध विकासकामे करताना गावठाणाच्या जागेचा बोध होत नसल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घरकुलासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देता येत नाही. पाटबंधारे विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते.

शासनाच्या गावठाणातील जमिनींचे सर्वेक्षण व भूमापन करणे योजनेअंतर्गत नागोसलीच्या गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी झाली आहे. मात्र, शिदवाडी व वैतरणा वसाहतीची मोजणी करण्यात आलेली नाही. भूमी अभिलेख विभागाकडून ड्रोनद्वारे मोजणीसाठी कर्मचारी आले असता, ही जागा पाटबंधारे विभागाची असल्यामुळे गावठाणाची मोजणी करता येणार नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली होती. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, नागोसली, शिदवाडी व वैतरणा या गावांना रितसर गावठाण उपलब्ध करून द्यावे, अशी भूमिका उपसरपंच अशोक शिंदे यांनी यावेळी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!