नाशिक (प्रतिनिधी): धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील येवला, नांदगाव, मालेगाव व सिन्नरच्या पूर्व पट्ट्यात २०२३ व २०२४ मध्ये फेब्रुवारीपासून तीव्र पाणी टंचाई जाणवली होती. त्यामुळे प्रशासनाने या तालुक्यांमध्ये पाण्याचे टँकर सुरु केले होते. मात्र, गेल्या वर्षी पावसाळ्यात वरुणराजाने नाशिकवर कृपादृष्टी ठेवल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये फेब्रुवारीच्या मध्यानंतरही सरासरी ६५ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर फेब्रुवारी महिना टँकरमुक्त ठरला आहे. गंगापूर धरणातही ७८ टक्के पाणी शिल्लक असल्याने नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, असे चित्र आहे.
२०२४ च्या जून व जुलै महिन्यात जेमतेम हजेरी लावणा-या पावसाने ऑगस्टमध्ये जिल्ह्याला झोडपून काढले. सलगच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे काठोकाठ भरली. गावोगावी पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत पुनर्जिवित झाले. विहिरींची पातळी वाढली. त्यामुळे प्रशासनाने सर्व तालुक्यांचा आढावा घेऊन अखेरच्या टप्यातील २७ टँकर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी टँकरची संख्या शुन्यावर आली. यावर्षी फेब्रुवारीत सर्व गावांमध्ये पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे यंदा धरणांचा जिल्हा टँकरमुक्त झाल्याचे दिसत आहे. नाशिककरांची तहान भागविणा-या गंगापूर धरणात सद्य:स्थितीत ७८.७६ टक्के पाणी आहे. मागील वर्षी या दिवसात ६२.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यामुळे फेब्रुवारीच्या मध्यावरच चिंतेचे ढग जमा झाले होते. यंदा मात्र गतवर्षीपेक्षा पाणीसाठा जास्त असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
