काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात ६२ इच्छुकांची मुलाखत; सर्वाधिक इच्छुक उमेदवार इगतपुरीत

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघ काँग्रेसला सोडावेत, अशी आग्रही मागणी महाविकास आघाडीकडे आम्ही करणार आहोत. विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडे ६२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत, अशी माहिती काँग्रेसचे निरीक्षक तथा प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी दिली.
शनिवारी (दि. ५) आमदार पाटील व खा. शोभा बच्छाव यांनी घेतल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शिरीष कोतवाल, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड, आ. हिरामण खोसकर, शरद आहेर, दिगंबर गिते, स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले की, १५ मतदारसंघांत प्रत्येकी साधारण तीन ते चार इच्छुक आहेत. या इच्छुकांनी सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी पक्ष आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष सर्वानुमते जो उमेदवार देईल, त्या उमेदवाराच्या मागे उभे राहणार असल्याचेही अनेकांनी स्पष्ट केल्याचा दावा पाटील यांनी केला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदारसंघांतून काँग्रेसने निवडणूक लढवली होती. यावेळी सहा जागांबरोबरच आणखी एका जागेची मागणी आम्ही पक्षाकडे करणार आहोत. कोणता मतदारसंघ पक्षाला सुटेल याबाबतचे तडजोडीचे अधिकार श्रेष्ठींकडेच राहणार असून, दस-याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची यादी निश्चित केली जाईल, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.
काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा असणा-यांची सर्वाधिक संख्या इगतपुरीत आहे. येथून तब्बल १३ जणांनी मुलाखती दिल्या. त्या खालोखाल नाशिक मध्य मतदारसंघात १२ जणांनी मुलाखती दिल्या. बागलाणला सात, तर येवल्यात चार इच्छुक आहेत. मालेगाव बाह्य, कळवण आणि सिन्नरला प्रत्येकी तीन व देवळाली वगळता उर्वरित मतदारसंघांत प्रत्येकी दोन-तीन जण इच्छुक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!