नाशिक (प्रतिनिधी): चाकूचा धाक दाखवत दहशत निर्माण करणा-या सराईत गुन्हेगाराने सहायक फौजदारास भोसकल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.४) रात्री घडला. प्रसंगावधान राखत सदर अधिका-याने रक्तबंबाळ अवस्थेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी उर्फ गट्या संजय जाधव (रा. अवधूतवाडी) असे पोलीस अधिका-यावर चाकू हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. याबाबत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव कारभारी सोनवणे (रा. धात्रक फाटा, आडगाव शिवार) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे हे शुक्रवारी (दि. ४) रात्री आठ वाजेच्या सुमारास सेवा बजावून दिंडोरीरोडने घराकडे जात होते. दिंडोरी नाका भागातील गीता हार्डवेअर दुकानाजवळ एक युवक चाकूचा धाक दाखवत दहशत निर्माण करीत होता. हा युवक रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगार विकी उर्फ गट्या जाधव असल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी आपले वाहन थांबवित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संशयिताच्या हातातील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. गट्या जाधव याने जीवे मारण्याची धमकी देत सोनवणे यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोनवणे यांनी त्यास न जुमानता चाकू हिसकावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. आपल्या मुसक्या आवळण्यात आल्याचे लक्षात येताच गट्या याने सोनवणे यांच्या पोटात धारदार चाकू खूपसला आणि झटका मारत पलायन केले.
रक्तबंबाळ अवस्थेत केला पाठलाग
पोटात चाकू खूपसला गेल्यामुळे सोनवणे रक्तबंबाळ झाले. मात्र, अशाही स्थितीत त्यांनी जीवाची पर्वा न करता संशयिताचा पाठलाग करीत अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. एक हात पोटावरील चाकूवर लावून धरत त्यांनी दुस-या हाताने प्रतिकार करीत संशयितास पकडून ठेवले. या सिनेस्टाइल प्रकाराची माहिती काही नागरिकांनी पंचवटी पोलिसांना कळवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आपल्या फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळ गाठून संशयितास ताब्यात घेतले. सोनवणे यांना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. सोनवणे यांनी प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विकी जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठांनी सोनवणे यांच्या प्रकृतीची चौकशी करीत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.
