दोन हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला पोलीस अधिकारी व हवालदार!

नाशिक (प्रतिनिधी): तक्रारदारास मदत केल्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून लाचेची मागणी करणा-या पोलीस अधिका-यासह हवालदारास एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष लाचेची दोन हजारांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी गुरुवारी (दि.२४) रात्री उशीरापर्यंत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सातपूर पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरिक्षक वर्ग-३ धनराज गावित (वय ५७) व हवालदार कांतीलाल गायकवाड (वय ४१) अशी संशयित पोलिसांची नावे आहेत. तक्रारदाराने सुमारे सहा वर्षांपूर्वी सातपूर आनंदवली शिवारातील एका गृहप्रकल्पाची उभारणी करणा-या बिल्डरकडे फ्लॅट बुक करून बिल्डर फर्म संचालकाच्या खात्यावर २१ हजार रुपये चेकद्वारे दिले होते. मात्र, पैसे देऊन सहा वर्षांचा कालावधी उलटला तरीही तक्रारदारास फ्लॅटची कागदपत्रे किंवा अ‍ॅडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम परत न मिळाल्याने त्याने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी गावित व गायकवाड यांच्याकडे देण्यात आली होती. १०-१२ दिवसांपूर्वी गायकवाड व गावित यांनी तक्रारदार व बिल्डरच्या प्रतिनिधीची चर्चा घडवून आणल्यानंतर बिल्डरच्या प्रतिनिधीने तक्रारदारास २१ हजारांचा चेक दिला. त्यामुळे गायकवाड व गावित यांनी काम करून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून बक्षीस म्हणून रकमेची मागणी केल्याने तक्रारदाराने त्यांना रोख दोन हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतर बुधवारी (दि. २३) संशयित गावित व गायकवाड यांनी पुन्हा पैशांची मागणी केली असता, तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार, एसीबीच्या पथकाने दोन्ही संशयितांना दोन पंचांसमक्ष दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एसीबीचे हवालदार सुनील पवार, दिनेश खैरनार, नाईक अविनाश पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!