नाशिक (प्रतिनिधी) : हद्दपारीची कारवाई केलेली असतानाही शहरात फिरणा-या दोघा तडीपारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जुने नाशिक परिसरातील वेगवेगळ्या भागात सोमवारी (दि.१०) ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अबुमुदस्सर अल्ताफ (वय ३०, रा. घर नं. ३१७७, बागवानपुरा) व रेहान ख्वाजा कुरेशी (रा. कुरेशीवाडा, वडाळा नाका) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये दोघांवर गेल्या महिन्यात पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. मात्र, दोघांचा शहरातच वावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्यांच्या मागावर असताना सोमवारी (दि. १०) चौधरी अमरधाम रोड भागात, तर कुरेशी आपल्या घरात मिळून आला. दोघांविरुद्ध हद्दपारी आदेशाचा भंग व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अंमलदार योगेश माळी आणि गुरू गांगुर्डे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
