मालेगावच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे विधी व न्याय विभागाला आदेश
नाशिक (प्रतिनिधी) : मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील बालिकेचे अपहरण करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांनी केला होता. याचा तपास करून याबाबतचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता मुख्यमंत्र्यांनी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याचे आदेश विधी व न्याय विभागाला दिले आहेत.
भाविका (रिया) ज्ञानेश्वर महाले (वय ८) हिचे दि. १४ मे रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता, १५ मे रोजी तिचा मृतदेह गावालगत असलेल्या मोसम नदीपात्रालगत असलेल्या विहिरीत संशयास्पदरीत्या आढळून आला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या ग्रामस्थ्यांनी नामपूर-मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. या घटनेची सखोल चौकशी करावी, आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीच्या वडिलांच्या पुरवणी जबाबावरून याप्रकरणी अपहरण करून तिचा खून व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चिमुरड्या बालिकेचा खून झाल्याने अजंग-वडेलसह तालुक्यातील ग्रामस्थांच्या भावना तीव्र होत्या. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास करीत, संशयित आरोपींना अटक केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बालिकेच्या कुटुंबास न्याय मिळावा म्हणून या घटनेची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावी, अशा मागणीचे पत्र पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते.
