सावाधान: सणासुदीला वेगवेगळ्या ठिकाणी चार महिलांचे दागिने हिसकावले!

नाशिक (प्रतिनिधी): रविवारी (दि.२७) वेगवेगळ्या भागात चार महिलांच्या गळ्यातील अलंकार दुचाकीस्वारांनी हिसकावून नेले. याप्रकरणी पंचवटी, उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सणासुदीत महिलांचा दागिन्यांचा वापर वाढला असल्याने दिवाळीची संधी साधत शहरात चेनस्नॅचर सक्रीय झाल्याचे चित्र आहे. सणासुदीच्या काळात महिला वर्गाची खरेदीसाठी लगभग सुरू झालेली असतानाच भामट्यांनी धुमाकूळ घातल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रकुंड भागात पहिली घटना घडली. याबाबत लिली अ‍ॅन्डू फर्नांडीस यांनी फिर्याद दिली आहे. फर्नांडीस रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असताना ही घटना घडली. पप्पू हजाम दुकानासमोरून त्या पायी जात असताना दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली. याच वेळी गुंजाळ बाबा डेअरी भागात दुसरी चैनस्नॅचिंग झाली. उषा संजय कलंत्री या परिसरातील रोहिणी साडी दुकानासमोरून पायी जात असताना दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दोन्ही घटनांबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात एकत्रित जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.
तिसरी घटना जगतापमळा भागात घडली. प्रतिभा विजय माळवे (रा.जगतापमळा, तरण तलावाजवळ ना. रोड) यांनी फिर्याद दिली आहे. माळवे या रविवारी दुपारच्या सुमारास बिटको चौकातून आपल्या घराकडे रस्त्याने पायी जात असताना ही चैनस्नॅचिंग झाली. तरण तलाव परिसरात पाठीमागून डबलसिट आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ४० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.
चौथी घटना जेलरोडला घडली. नलिनी वासूदेव भोळे (रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ तापी नगर,जेलरोड) या वृध्देने याबाबत फिर्याद दिली आहे. भोळे या रविवारी सायंकाळी मिठाई घेण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातून त्या मिठाई खरेदी करून घराकडे जात असतांना ही घटना घडली. गणेश व्यायाम शाळा भागातील खाचणे हॉस्पिटल समोरून त्या पायी जात असतांना डबलसिट प्रवास करणा-या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!