वसुबारसचा मुहुर्त सधत इच्छुकांनी केली गर्दी; अपक्षांसह पक्षीय उमेदवारांचे अर्ज दाखल!

नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीसाठी वसुबारसच्या मुहुर्तावर इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गर्दी केली. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि इगतपुरी – त्र्यंबकेश्वर मतदारसंघांची निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातून राबविण्यात येत असल्याने सोमवारी ख-या अर्थाने निवडणुकीचा माहोल पहायला मिळाला. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये डझनभर इच्छुक असल्याने बंडखोरीची शक्यता वर्तविली जात आहे. उमेदवारी नाकारलेल्या अनेक प्रबळ इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकावत उमेदवारी अर्ज दाखल केले.
शहराच्या मध्यवर्ती भागाचा समावेश असलेल्या नाशिक मध्य मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती. महायुतीने शेवटच्या क्षणी विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीत मात्र बंडखोरी अटळ मानली जाते आहे. महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार वसंत गिते यांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे नाराज असलेल्या काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मनसेकडून अंकुश पवार यांनीही अर्ज भरला आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे हनीफ बशिर यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला.
नाशिक पश्चिम मतदार संघातून विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्यासह १० जणांनी अर्ज दाखल केले. मनसेच्यावतीने दिनकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर माकपाच्या वतीने डॉ. डी. एल. कराड यांनी अर्ज दाखल केला. बसपाच्यावतीने भरत सुर्वे यांनी अर्ज दाखल केला आहे. मान्यताप्राप्त ४ पक्षांव्यतिरिक्त ६ अपक्षांच्या माध्यमातून १४ अर्ज दाखल झाले आहेत. माजी महापौर दशरथ पाटील, माजी नगरसेवक शशिकांत जाधव, करण गायकर, देवा वाघमारे, समाधान पाटील, राजू सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
नाशिक पुर्व विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आ. अ‍ॅड. राहूल ढिकले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेचे उमेदवार प्रसाद सानप यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक तिरंगी केली आहे. देवळाली मतदार संघातून महायुतीच्या अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांनी अर्ज दाखल केला. इगतपुरी मतदार संघात महायुतीचे उमेदवार आ. हिरामण खोसकर यांच्या विरोधात माजी आमदार निर्मला गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!