मतदानाचा टक्का वाढला: कोण जिंकणार कोण हरणार? यावर चर्चा रंगतेय!

गतवेळ पेक्षा 5.37 टक्क्यांनी वाढले मतदान तर 2019 ला 62.60 टक्के होते.. यंदा 67.97 टक्के झाले मतदान. जनजागृती वाढल्याने मतदार राजा सजग होताना दिसला. तसेच महिला 9.33 टक्क्यांनी वाढल्या तर 2019 ला 57.6 टक्के, तर यंदा 2024 ला 66.93 टक्के महिलांनी मतदान केले.. म्हणजे 9.33 टक्के वाढ झाली आहे.

नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) संपूर्ण जिल्ह्यात अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. त्यात निफाड आणि नाशिक पश्चिम वगळता सर्वच तालुक्यात मतदानाच्या टक्केवारीत सरासरी ५ टक्के वाढ झाली असून वाढलेला हा टक्का कोणाला धक्का देतो याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली रणधुमाळी मतदानानंतर थांबली. त्यात अनेक मुद्यांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदानात चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतदान नोंदवतानाच यंदाच्या आकडेवारीने लोकसभा निवडणुकीच्या टक्केवारीलाही मागे टाकले आहे. जिल्ह्यात सरासरी ५ टक्के वाढ नोंदवत जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीने ६७.९७ टक्के मतदान नोंदवण्यात आले. यात सर्वाधिक वाढ नांदगाव येथे तर जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान दिंडोरी (७८) येथे नोंदवण्यात आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात उत्स्फूर्त मतदान करण्यात आले. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाचा वेग पाहता यंदा रेकॉर्डब्रेक मतदान होईल असा अंदाज लावला जात होता. मात्र दुपारी 3 नंतर त्यात संथपणा आल्याने शेवटच्या टप्प्यात मतदानाची वाढ घटली. तब्बल ८ तालुक्यांमध्ये ७० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त मतदान नोंदवले गेले तर तीन तालुक्यांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. कोण जिंकणार कोण हरणार? यावर सर्वत्रच चर्चा रंगल्याचे चित्र दिसून येत आहे.

दिंडोरी सर्वाधिक मतदान: सर्वाधिक दिंडोरी मतदार संघात 78.01 टक्के मतदान झाले. सर्वात कमी नाशिक मध्य मतदारसंघात झाले. येथे 56.08 टक्के मतदान झाले आहे.

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या प्रयत्नांना यश आल्याने त्यातून दिसून आले. नाशिक पश्चिम आणि निफाड वगळता उर्वरित तेरा तालुक्यांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत सरासरी ५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. नाशिक शहरातील उर्वरित तीनही मतदारसंघातील नाशिक पूर्व ७ टक्के, मध्य ८ टक्के तर देवळालीत ३ टक्के वाढ नोंदवण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मतदानात झालेली वाढ आता कोणाला धक्का देते आणि मतदारराजा कोणाला तारतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून शनिवार (दि. २३) पर्यंत तरी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!