टोळक्याने केला तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला!

नाशिक (प्रतिनिधी): भावास मारहाण केल्याच्या कारणातून चारचाकीतून आलेल्या टोळक्याने परप्रांतीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना स्नेहनगर भागात घडली. या घटनेत लाकडी बॅटने मारहाण करीत टोळक्याने धारदार शस्त्राने वार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंग्या पगारे त्याचा भाऊ व त्यांचे दोन साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत नीलेश ओमप्रकाश जैसवाल (वय २०, रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे जखमी युवकाचे नाव आहे. जैसवाल गेल्या मंगळवारी (दि.२२) रात्री स्नेहनगर येथील दृप्रिती पार्क सोसायटी भागात आपल्या मित्रासमवेत गप्पा मारत असताना ही घटना घडली. चारचाकीतून आलेल्या टोळक्याने ‘माझ्या भावाला मारले, तुझा गेमच करतो, तु मला ओळखत नाही, मला मंग्या पगारे भाई म्हणतात’ असे म्हणत संशयित मंग्यासह टोळक्याने नीलेश जैसवालला बेदम मारहाण केली. या घटनेत टोळक्याने लाकडी बॅटने मारहाण करीत जैसवाल याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!