एसीबीच्या जाळ्यात धर्मदाय नोंदणी कार्यालयाचा कारकून

नाशिक (प्रतिनिधी): न्याय प्रविष्ठ कामकाजात अडथळा न आणता जलद गतीने कामकाज चालविण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच स्वीकारणा-या नोंदणी कार्यालयातील कारकुनास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या. या कारवाईत धर्मदाय उपायुक्तांच्या लघुलेखकावर संशयितास प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज उशीरा पर्यंत सुरू होते.
एसीबीच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमंत सुरेस पुराणीक (वय ४०, रा. श्रीनिधी बंगला, डीजीपीनगर १, नाशिक-पुणे रोड) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तो द्वारका येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात न्याय लिपीक (निरीक्षक) पदावर कार्यरत आहे. याप्रकरणात संदीप मधुकर बावीस्कर (वय ४७ रा.रायगड चौक, सिडको) यांनी प्रोत्साहन दिल्याचा आरोप असून ते धर्मदाय उपायुक्त कार्यालयात लघुलेखक पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार यांचेकडे नविन दाखल फाईलच्या नेमलेल्या तारखा देणे, सुनावणी कामकाजात अडवणुक न करणे, निकाली फाईल नकला विभागाला विहीत वेळेत पाठविले बद्दल व येणाºया पुढील सुनावणीचे कामकाजात अडथळा न आणता कामकाज जलद गतीने करुन देण्याच्या मोबदल्यात न्याय लिपीक असलेल्या संशयित सुमंत पुराणीक यांनी २० हजार रूपयांची लाच मागितली. मात्र याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. दरम्यान, तडजोडी अंती हा व्यवहार १५ हजार रूपयांवर निश्चित करण्यात आला. गेल्या २३ सप्टेंबर रोजी याबाबत एसीबीने पडताळणी करून मंगळवारी (दि.१) त्याच्याच शासकीय कार्यालयात सापळा लावला असता संशयित पुराणीक यास दहा हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाई दरम्यान संशयित बाविस्कर याने लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे समोर आल्याने दोघा संशयितांविरोधात पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व अप्पर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चैधरी, व अंमलदार अनिल गांगोडे आदींच्या पथकाने केली.
जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815; 9822262885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!